Ad will apear here
Next
‘संस्कृती’ जपणाऱ्या ‘मंगळागौरी’


श्रावण आला की सोबत सणवारांची मोठी पलटणच घेऊन येतो आणि त्यासोबत नवा उत्साहही. मंगळागौरीचं व्रत आणि त्या वेळी खेळले जाणारे खेळ हादेखील असाच एक उत्साहाचा स्रोत. आपल्या मराठी संस्कृतीचा हा मोठा ठेवा तर आहेच, पण दुसरीकडे महिलांचं शारीरिक अन् मानसिक स्वास्थ्य राखण्याचं कामही हे खेळ करतात. बदलत्या काळानुसार या खेळांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात आणि गाण्यांमध्येही आवश्यक ते सकारात्मक बदल करून संस्कृती टिकवण्याचं काम बोरीवलीचा संस्कृती ग्रुप गेली वीसहून अधिक वर्षं करतो आहे. त्यांच्या या उपक्रमाचा संस्थापिका विनया संभूस यांनी घेतलेला हा आढावा....
.............
आजच्या स्त्रियांचं आयुष्य अक्षरशः (मोबाइलच्या) घड्याळाबरोबर फिरणारं झालंय. रोजच्या धावपळीच्या जगात कुटुंब आणि नोकरीची तारेवरची कसरत करताना आपली संस्कृती आणि परंपरा जपायला वेळच कुठे मिळतो त्यांना? त्यात तरुण पिढीची बदलत चाललेली जीवनशैली आणि रुजलेली ‘मॉल संस्कृती’ या सर्वांमध्ये जीवनमूल्यंच जणू हरवत चालली आहेत. पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण करण्याच्या नादात भारतीय संस्कृती ‘आउटडेटेड’ होत चाललेली दिसते. या पार्श्वभूमीवर, आपली मराठी संस्कृती, परंपरा, श्रद्धा, चाली-रीती मंगळागौरीसारख्या व्रतातल्या खेळांच्या माध्यमातून जपण्याचं काम  ‘संस्कृती ग्रुप’च्या माध्यमातून आम्ही गेली वीस वर्षं करत आहोत. 

पूर्वीच्या काळी स्त्रियांना घरातून बाहेर पडण्यासाठी, माहेरी जाण्यासाठी सणवार आणि असे खेळ हे निमित्त असायचं. आता मुली हवं तेव्हा माहेरी जाऊ शकतात. नोकरी करण्यासाठी बाहेर असतात, त्यातून विरंगुळा म्हणून हे कार्यक्रम होऊ शकतात. 

आमच्या मंगळागौरीच्या कार्यक्रमांची सुरुवात दीपनृत्यानं होते. नंतर मंगळागौरीची आरती केली जाते आणि खेळांना सुरुवात होते. सगळे मिळून ५५ खेळ आम्ही सादर करतो, ज्यामध्ये आठ प्रकारच्या फुगड्या, वेगवेगळ्या सात प्रकारचे झिम्मे, टिपऱ्या, लेझीम अन् विशेष म्हणजे वारकऱ्यांच्या दिंडीचाही समावेश असतो. कोकणात ‘भात सडणे’ हा प्रकार असतो. तो नवीन पिढीला कळावा, म्हणून आम्ही दंड-फुगडीद्वारे तो खेळून दाखवतो. 

बसफुगडी, गाठोडे, दिंड्या, कोंबडा असे खेळ म्हणजे सर्वांगाला उत्तम प्रकारे व्यायामच! गोफ हा चार जणींचा खेळ! यात आमच्यापैकी प्रत्येकीला क्रमाक्रमाने हालचाल करून, लगेच समोरच्या भिडूची जागा जलद गतीनं घ्यावी लागते आणि ते करत असताना, न थांबता शरीराची वैशिष्ट्यपूर्ण हालचाल करावी लागते. भोवरभेंडी, तिखट-मीठ-मसाला हे सर्वांगसुंदर व्यायामाचे खेळ आम्ही सादर करतो. 

आमच्या सर्वच खेळांचं वैशिष्ट्य म्हणजे या खेळांसाठी कोणत्याही महाग वस्तूंची गरज नसते. ‘लाटणं-झिम्मा’ या खेळात आम्ही लाटण्याचा उपयोग करतो, तर नारळाच्या करवंटीसारख्या टाकाऊ वस्तूचा उपयोग आम्ही करवंटी-झिम्म्यासाठी करतो. त्या करवंट्याही खूप छान प्रकारे रंगवलेल्या असतात. सुपांच्या खेळासाठी वापरतो ती सुपंसुद्धा आम्ही आकर्षक रंगात रंगवलेली आहेत. सूप पडलं की मोठी लांबलचक नावं, आधुनिक उखाणे घेताना भरपूर मज्जा येते. 

आमच्या ग्रुपनं बसवलेले ‘झिम्मे’ हे अगदी उडत्या चालीच्या गाण्यांवर (डौल मोराच्या मानंचा, गळ्यात साखळी सोन्याची, काळी माती) आहेत, त्यामुळे खेळणाऱ्यांना आणि बघणाऱ्यांना आणखीच मजा येते. ‘आगोटापागोटा’ या खेळात संपूर्ण शरीराची हालचाल एखाद्या पक्षाप्रमाणे होत असते, तर ‘वड बाई वड’ या खेळातसुद्धा शरीर एका आकर्षक लयीत हलवावं लागतं. ‘पिंगा’ या खेळामध्ये आम्ही गुडघ्यामध्ये वाकून गोलगोल फिरून पिंगा घालतो. या खेळामुळे पोटावरची चरबी कमी व्हायला मदत होते हे आवर्जून सांगू इच्छिते. आजकाल घरोघरी स्वयंपाकघरात ओटे आणि डायनिंग टेबलं असतात, ज्यामुळे महिलांवर गुडघेदुखीसारखा आजार ओढवतो. यावर रामबाण उपाय म्हणजे ‘किकीचं पान बाई किकी’ हा खेळ. हा खेळ खेळला की गुडघेदुखी गायब! मंगळागौरीच्या अशा बहुतेक खेळांमधून आपल्याला एक प्रकारची ऊर्जा मिळत असते. हे खेळ खेळल्यामुळे ‘जिम’मध्ये जाण्याची वेगळी गरज नाहीच! कारण इतके सारे खेळ खेळून सर्वांगाला मस्त व्यायाम होतो आणि वजन कमी व्हायला मदत होते. 

आजकाल दोन विहिणी किंवा सासू-सुना यांच्या नात्यात चांगलाच मोकळेपणा आला आहे. आमच्या खेळातल्या सासू-सुनेचं नातंसुद्धा हेवा करण्याजोगं! गाण्यामधल्या सून आणि सासू दोघी हुशार आहेत. सासू विचारते ‘माझ्या पाटल्या कुठे ठेवल्यास?’ त्यावर सून उत्तरते, ‘चोरी होईल म्हणून लॉकरमध्ये ठेवल्यात.’ गाण्याच्या शेवटी सासूबाई म्हणतात ‘सून माझी हुशार फार’ तर सून म्हणते, ‘सासूबाई माझ्या आदर्श फार!’ अशा पद्धतीची बदलतं सामाजिक भान असणारी गाणी आम्ही घेतली आहेत. आमच्या मंगळागौर खेळांचं अनोखं वैशिष्ट्य म्हणजे पुरुषांची मक्तेदारी असलेल्या ‘बाल्या डान्स’नं आम्ही आमच्या कार्यक्रमाची सांगता करतो. आम्ही साऱ्या जणी देहभान विसरून या खेळांचा मनमुराद आनंद लुटत असतो आणि पाहणाऱ्यांनाही तसाच आनंद देत असतो.  

आमच्या ग्रुपमधल्या बऱ्याच बायका नोकरी करणाऱ्या आहेत. प्रत्येकीला धावपळीच्या आयुष्यामुळे काही ना काही स्ट्रेस असतोच; पण ग्रुपमधल्या प्रत्येकीचा हाच अनुभव आहे की आम्ही आमच्या हॉलमध्ये येऊन रिहर्सल सुरू करायचा अवकाश, आम्ही लगेच फ्रेश होतो. ऑफिसमधले सगळे ताणतणाव विसरून जायला होतं. ग्रुपतर्फे आम्ही मंगळागौरीच्या कार्यक्रमाबरोबरच डोहाळेजेवण, भोंडला यांचेदेखील कार्यक्रम करत असतो. हे कार्यक्रम वर्षभर चालूच असतात. 

या व्यतिरिक्त दर वर्षी आम्ही ग्रुपतर्फे एका कार्यालयात भोंडल्याचा कार्यक्रम करतो. आम्हाला सत्यनारायणाच्या पूजेसाठी, तसंच १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशीही आमंत्रणं येत असतात. बायकांच्या भिशी, हळदीकुंकू समारंभ अशा समारंभांसाठीसुद्धा आमचे कार्यक्रम होतात. झी टीव्हीवरच्या प्रशांत दामले यांच्या ‘आम्ही सारे खवय्ये’मध्ये आम्ही डोहाळेजेवणाचा कार्यक्रम सादर केला होता. तसंच ‘जय मल्हार’ मालिकेत हळदीकुंकवाचा कार्यक्रम सादर केला होता. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना ‘वर्षा’ बंगल्यावर कार्यक्रम करण्याची संधीही आम्हाला मिळाली होती. 

२०१७मध्ये आमच्या संस्कृती ग्रुपचा एक उत्तम कार्यक्रम झाला. १५ ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्यदिनाच्या मंगळवारी आमचे प्रत्येकी अडीच-तीन तासांचे आणि ५५ प्रकारच्या खेळांचे, तब्बल चार कार्यक्रम एकाच दिवसात सादर झाले. यंदाही करोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही फेसबुकद्वारे ई-मंगळागौर उपक्रम राबविला.

संस्कृती ग्रुपला यंदा २३ वर्षं पूर्ण झाली, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. ग्रुप स्थापन केला त्यावेळी अक्षरशः मजकूर टाइप करून ठिकठिकाणी भित्तिपत्रकं चिकटवून प्रसिद्धी केली होती. आता मात्र आमच्या हितचितकांच्या ‘माउथ-पब्लिसिटी’द्वारेच आम्हाला कार्यक्रम मिळत असतात. आमच्या फेसबुक ग्रुपद्वारेही प्रचंड प्रतिसाद मिळत असतो. मी, सरोज महाजन आणि मानसी जोशी अशा तिघींनी मिळून स्थापन केलेला हा ग्रुप आता आमच्या इतर सख्यांबरोबर यशस्वी वाटचाल करत आहे. 

-  विनया पुष्कराज संभूस
ई-मेल : vsambhus@gmail.com

(लेखिका बोरीवली (पश्चिम) येथील संस्कृती ग्रुपच्या संस्थापक आहेत.)

(‘संस्कृती ग्रुप’तर्फे सादर केल्या जाणाऱ्या मंगळागौरीच्या काही निवडक खेळांचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

(करोना लॉकडाउनमधील ई-मंगळागौरीचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZZOBF
 खुप खुप सुंदर
नाच ,अरेंज मेंन्ट.ड्रेस
खुपच सुंदर1
 Vinya mi tuze phar aabhar mante ki tu mla ya group mdhe member keles mla tuza phar abhiman vatato... tuze kaituk krave tevdhe thode ch ahe
Mla hi abhima ahe ki mi tuza group chi member ahe
Tuze ani prasnna sra che khup khup abhari
Thanks1
 Aapli sankriti jivant thevaynche ani tyacha prasar karayche kam, ha group khup sunder prakare karto. 1.08.2017 roji mazi mangalagaurcha karekaram aplayla group mule khup chan zala. Thankyou Sanskruti Group.1
Similar Posts
उगारची चैत्रगौर "आता येईन चैत्र मासी" असे हादग्याच्या गाण्यातून वचन दिल्याप्रमाणे चैत्रगौर चैत्र महिन्यातल्या शुक्ल पक्षात तृतीयेला माहेरवाशीण म्हणून सन्मानाने यायची. ती पहिली तीज असायची.
लोकशिक्षक संत तुकाराम जीवनातील सर्व चढउतारांमध्ये संत तुकारामांमधील माणूसपण टिकून राहिले आहे. सर्वसामान्य माणसासारखे राहून, माणूसपणा कायम ठेवून माणुसकीच्या शिडीवरून देवत्वाला पोहोचलेला हा संत आहे. म्हणूनच सर्वसामान्यांना ते आपलेसे वाटतात. त्यांनी लोकशिक्षकाची मोठी भूमिका निभावली. आज तुकाराम बीज आहे. या दिवशी संत तुकारामांचे सदेह वैकुंठगमन झाले असे मानले जाते
महर्षी अरविंद यांचे अजरामर महाकाव्य - सावित्री महर्षी अरविंद (१५ ऑगस्ट १८७२ ते पाच डिसेंबर १९५०) यांना सारे जग एक श्रेष्ठ अध्यात्मिक गुरू म्हणून ओळखते. त्यांनी लिहिलेले सर्वांत प्रसिद्ध महाकाव्य म्हणजे ‘सावित्री’. सुमारे २४ हजार ओळींचे हे खंडकाव्य म्हणजे दिव्य आध्यात्मिक चिंतन आहे. अनेक वर्ष ‘सावित्री’चे इंग्रजीत लेखन सुरू होते. पुढे मराठीसह अनेक भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले
उपनिषदांचे अंतरंग वेद, उपनिषदे म्हणजे ज्ञानाचे प्राचीन भांडार आहे. यातील उपनिषदांचे अंतरंग उलगडून सांगत आहेत ज्येष्ठ लेखक, अनुवादक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरातून...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language